शेतकरी संघर्षाला यश! ३१०० रुपये प्रतिटन दराचे लेखी आश्वासन, आंदोलन स्थगित

[metaslider id="122"]

शेतकरी संघर्षाला यश! आंदोलन स्थगित

२१ शुगर सायखेडा कारखाना प्रशासनाकडून ३१०० रुपये प्रतिटन देण्याचे लेखी आश्वासन; मागील थकीत ४०० रुपयेही मिळणार!

सोनपेठ तालुक्यातील सायखेडा येथील २१ शुगर कारखान्याच्या गळीत हंगाम २०२६-२७ साठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ३१०० रुपये दर देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर केवळ २७०० रुपये प्रतिटन प्रमाणेच रक्कम जमा केली जात असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष टीमने आक्रमक भूमिका घेत १० नोव्हेंबर रोजी कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानुसार आज, १० नोव्हेंबर रोजी शेतकरी संघर्ष टीमचे पदाधिकारी व ऊस उत्पादक शेतकरी कारखाना गेटसमोर आंदोलनासाठी एकत्र आले. शेतकऱ्यांचा वाढता आक्रोश आणि आंदोलनाची गंभीरता लक्षात घेता कारखाना प्रशासनाने तातडीने शेतकरी संघर्ष टीमसोबत चर्चा केली.

या चर्चेदरम्यान कारखाना प्रशासनाने लेखी स्वरूपात आश्वासन दिले की, यापूर्वी ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर २७०० रुपये प्रतिटन प्रमाणे रक्कम जमा करण्यात आली आहे, त्यांच्या खात्यावर उर्वरित ४०० रुपये प्रतिटन प्रमाणे रक्कम तातडीने जमा करण्यात येईल. तसेच यापुढे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ३१०० रुपये प्रतिटन प्रमाणे एकरकमी रक्कम अदा करण्यात येईल.

कारखाना प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर शेतकरी संघर्ष टीमच्या वतीने सुरू करण्यात येणारे धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले.

आंदोलनाच्या यशात यांचा पुढाकार!

या आंदोलनात प्रामुख्याने अजय बुरांडे सर, ऋषिकेश जोगदंड, विश्वंभर गोरवे, रामेश्वर मोकासे, शिवाजी कदम, राजाभाऊ पौळ यांच्यासह इतर ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे कारखाना प्रशासनाला लेखी आश्वासन द्यावे लागले. त्यामुळे या आंदोलनाकडे शेतकरी एकजुटीचा विजय म्हणून पाहिले जात आहे.

शेतकरी एकजूट जिंदाबाद!

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संघर्ष सुरूच राहणार!

[metaslider id="122"]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Verified by MonsterInsights