धान उत्पादक शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिटमधून मिळणार अतिरिक्त आर्थिक लाभ
गोंदिया, दि. 20 : ‘धानाचे कोठार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना पारंपरिक पीक उत्पन्नासोबतच अतिरिक्त आर्थिक उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), गोंदिया यांच्या वतीने कार्बन क्रेडिट विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. 17 नोव्हेंबर 2026 रोजी हॉटेल ग्रॅन्ड सिता, गोंदिया येथे ही कार्यशाळा पार पडली. हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाताना पर्यावरणपूरक शेती पद्धतींचा अवलंब करून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

महिला आर्थिक विकास महामंडळ, मुंबईच्या व्यवस्थापकीय संचालक राजलक्ष्मी शहा (भाप्रसे) यांच्या संकल्पनेतून हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यशाळेत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होत माविम, मुंबईच्या कार्यक्रम व्यवस्थापक गौरी दोन्दे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कार्बन क्रेडिट संकल्पना आणि तिचे शेती क्षेत्रातील महत्त्व विशद केले.
यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, भातशेतीमध्ये पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी अल्टरनेट वेटिंग अँड ड्रायिंग (AWD) पद्धतीचा अवलंब, सेंद्रिय खतांचा वापर तसेच पीक अवशेष न जाळता त्यांचे योग्य व्यवस्थापन केल्यास हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यास मदत होते. त्याचबरोबर जमिनीचा पोत आणि सुपीकता सुधारण्यासही हातभार लागतो. अशा पर्यावरणपूरक शेती पद्धतींच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या कार्बन क्रेडिटची विक्री करून शेतकऱ्यांना शेती उत्पन्नाव्यतिरिक्त थेट आर्थिक मोबदला मिळविण्याची संधी उपलब्ध होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यशाळेत RBDC अमरावती विभाग तथा कार्बन क्रेडिट प्रकल्पाचे नोडल अधिकारी पवन देशमुख, RBDC नागपूर विभागाचे अमित गाढे, अमरावती विभागाचे विभागीय सल्लागार केशव पवार, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे, DPC हेमंत मेश्राम, उपजीविका सल्लागार भुपेन आणि वृंदावन यांनी प्रकल्पाची संकल्पना, अंमलबजावणीची प्रक्रिया तसेच शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्याबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेला जिल्ह्यातील विविध लोकसंचालित साधन केंद्रांचे (CMRC) व्यवस्थापक आणि सहयोगिनी उपस्थित होते. कार्यशाळेच्या माध्यमातून कार्बन क्रेडिट प्रकल्पाची माहिती तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार करण्यात आला. यापुढे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील लोकसंचालित साधन केंद्राच्या स्तरावर कार्यकारिणी मंडळ, माविम मित्र मंडळ तसेच समुदाय संसाधन व्यक्ती (CRP) यांच्यासाठी स्वतंत्र कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या उपक्रमाद्वारे जिल्ह्यातील जास्तीत जास्त धान उत्पादक शेतकऱ्यांची कार्बन क्रेडिट प्रकल्पांतर्गत नोंदणी करून त्यांना आधुनिक, पर्यावरणपूरक आणि शाश्वत शेती पद्धतींकडे प्रोत्साहित करण्यात येणार आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासोबतच शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सरोज कावळे ब्युरो हेड गोंदिया
[metaslider id="122"]